ससे - लाल आणि पांढरे
सिद्धेश पूरकर | ४ एप्रिल २०१७
नसीम ह्या इराणी लेखकाचं व्हाईट रॅबीट रेड रॅबीट हे मूळ इंग्रजी नाटक मला मराठीमध्ये भाषांतरित करायची संधी मिळाली. इंग्रजी नाटक, त्यात इराण मध्ये घडणारं म्हणजे काहीतरी बोअरिंग रडगाणं असणार असा मी पूर्वग्रह करून घेतला होता. पण जसं मी ते वाचत गेलो, तसा मी संहितेत असलेल्या स्थळकाळाच्या नाट्यमयतेत, ज्याप्रकारे नसीम रूपकं वापरून त्यातून इराणमधील स्थिती सांगू पाहतोय; त्या सगळ्या त्याच्या प्रवासात मी हरवून गेलो आणि हा नसीम खाजगीमध्ये थेट माझ्याशीच बोलत आहे, असं मला वाटू लागलं; आणि संहिता वाचायच्या आधीचा माझा पूर्वग्रह किती संकुचित विचारसरणीचा होता हे मला समजलं. नसीमने सहज बोली भाषेत हा प्रयोग लिहिला आहे. त्यामुळे भाषांतर करताना ते अगदी सहज होऊन गेलं. फक्त ते भाषांतर वाटणार नाही ह्याची मला काळजी घ्यायची होती. मला स्वतःचा कुठलाही विचार तिथे मांडता येणार नव्हता. परंतु, जिथे संहिता प्रेक्षकांशी संवाद साधू पाहाते, त्यांना प्रयोगाचा भाग बनवू पाहाते तिथे आपला मराठी प्रेक्षक, जो की स्वतःला अगदी ‘रसिक’ म्हणवून घेतो, तो तिथे अपेक्षित असा सहभाग घेणार का? अशी माझ्या मनात धास्ती होती. कारण अश्या प्रयोगाची रसिकांना तशी सवय नाही. म्हणून मग त्याकरिता मोजके काही फेरबदल तेवढे मी केले आणि मराठी संहिता तयार झाली.
१. ही संहिता नटाला/नटीला थेट प्रयोगाआधी स्टेजवर दिली जावी.
२. प्रयोगाआधी ४८ तास काही सूचना मात्र त्याला दिल्या जाव्यात.
३. सादरकर्त्याने सादर करायच्या आधी ही संहिता वाचलेली नसावी.
४. त्याला प्रयोगाबद्दल काहीही माहिती देखील नसावी आणि त्याने ती जाणून घ्यायचा प्रयत्न ही करू नये.
नसीमने अश्या ह्या काही व्हाईट रॅबीट रेड रॅबीट हा social experiment सादर करण्यासाठी घातलेल्या अटी आहेत.
आता ह्या अटी घेऊन जेव्हा आम्ही नट-नट्यांना तुम्ही हा प्रयोग सादर कराल का? म्हणून संपर्क साधू लागलो, तेव्हा काही नटांनी आधी संहिता वाचू आणि मग प्रयोग करू अशी भूमिका घेतली तर, काहींच्या ते बहुधा तत्त्वात बसलं नाही. पण काहींनी मात्र उस्फुर्तपणे लगेच होकार दिला आणि ते ह्या प्रयोगाचे भाग झाले. पहिला प्रयोग केला अभय महाजनने. साधारणतः नाटकाला जाताना प्रेक्षकांना कथानकाचा काहीतरी एक अंदाज असतो पण, इथे मात्र तसा कुठलाच अंदाज नव्हता. तरी कुतुहलापोटी पहिल्या प्रयोगाला बरीच गर्दी जमली होती. मी एकटा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या ए.सी. युक्त विंगेत कुडकुडत उभा राहून, फेऱ्या मारत, आनंदाने उड्या मारत हा प्रयोग सादर होताना पाहात होतो. त्याआधी मी हा प्रयोग सादर होताना पाहिला नव्हता. त्यामुळे मला हे जाणवत होतं की, जेव्हा ही संहिता सादर केली जाते, तेव्हा त्या नटामुळे, प्रेक्षकांमुळे ती किती वेगळा आकार घेऊ शकते. प्रयोग चांगला झाला. पण प्रयोगानंतर जे झालं ते मला फार गंमतीदार वाटलं. जनरली पुण्यात तरी प्रायोगिक नाटकाचा प्रयोग झाला की, लोक बाहेर येऊन लगेच आपापल्या गटानुसार छोटे छोटे गोल करून नाटकाविषयी चर्चा करू लागतात आणि लगेच नाटकाविषयीची त्यांची प्रतिक्रिया स्पष्ट करतात. इथे मात्र तसं झालं नाही, कुणालाच पटकन काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं. सगळेजण शांतपणे काय घडलं ह्याचा विचार करत होते. कारण कोणीच त्याआधी तसं काही पाहिलं नव्हतं.
एकूण पंधरा प्रयोगांपैकी दोन - तीन प्रयोगांना इच्छा असूनही काही कारणामुळे उपस्थित राहू शकलो नाही. तरी काही प्रयोगात घडलेल्या काही विशेष घटना मला सांगाव्याश्या वाटतात. भरत नाट्य मंदिर इथे मुक्ता बर्वे ज्यादिवशी हा प्रयोग सादर करणार होती बरोबर त्याच दिवसाच्या आदल्या दिवशी त्याच रंगमंचावर अश्विनी एकबोटे ह्यांचं दुखःद निधन झालं होतं. आणि प्रयोगाच्या उत्तरार्धात जेव्हा संहिता नटीला एक अनपेक्षित कृती करायला सांगते, त्या क्षणाला मुक्ताला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना आता पुढे काय होणार अशी एक भीतीची भावना तयार झाली. अतुल पेठेंनी प्रयोग सादर करताना संहितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा प्रयोग पाहून मला त्यांनी नरेंद्र दाभोळकर गेल्यानंतर सुदर्शनला केलेल्या त्या एका अनोख्या प्रयोगाची आठवण झाली. नसीमने दर प्रयोगाला त्याच्यासाठी प्रेक्षकातील पहिल्या रांगेतील एक खुर्ची राखून ठेवा असं सांगितलं आहे. अलोक राजवाडे सादर करत असताना, तो एका क्षणी त्या नसीमसाठी राखून ठेवलेल्या मोकळ्या जागी जाऊन बसला आणि सादर करू लागला. तेव्हा स्टेज रिकामे होते आणि अलोक जणू नसीम झाला होता. आता अलोक हा एक दिग्दर्शक असल्याने, त्याने सादर करताना आपसूक संहितेतील काही वेगळे बारकावे समोर आणले. नट हा प्रयोग एकदाच सादर करू शकतो, पण प्रेक्षक त्याचा पुन्हा पुन्हा भाग होऊ शकतात. ज्या प्रेक्षकांनी ह्या नाटकाचे एकाहून अधिक प्रयोग पाहिले, त्यांना एकच संहिता किती वेगवेगळ्या पद्धतीने सादर होऊ शकते हे पाहता आलं. आणि मुख्य म्हणजे, मला वाटतं ह्या प्रयोगात नटाइतकाच प्रेक्षकांचा सहभाग देखील महत्त्वाचा राहिला. समोर चाललेल्या प्रयोगाविषयी ते किती संवेदनशील आहेत ह्याचा सादरीकरणावर थेट परिणाम होत गेला. मी एका कार्यक्रमाला गेलो असताना, मध्यंतरात मी वडा खात असता, एका मुलीने येऊन मला सरळ प्रश्न केला, तुम्ही ते व्हाईट रॅबीट वाले ना? मी नाटक पाहिलं. पण त्याला नाटक म्हणायचं का नाही? हा माझा प्रश्न आहे. दुसरं, तुमची स्वतःची नाटकाची व्याख्या काय आहे? ह्यावर मी काही फार आश्चर्य व्यक्त केलं नाही, कारण हा प्रश्न मला प्रयोगांनंतरच्या प्रतिक्रियांमधून अपेक्षित होता. तालमीशिवाय, दिग्दर्शकाशिवाय प्रयोग होऊ शकतो हेच मुळात काहीतरी वेगळं होतं. व्हाईट रॅबीट रेड रॅबीट मुळे नाटक करण्याच्या, ते पाहण्याच्या, त्याची समीक्षा करण्याच्या व्याखेलाच एक धक्का बसला आणि मला वाटतं तो गरजेचाही होता. कारण पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे सध्याला दिवसा दुपारी रात्री मध्यरात्री नाटकांचे जलसे होत आहेत; तिथे मला वाटतं ज्या प्रकारची नाटकं होताना मी पाहतोय, ती सगळी जरी विविध रंगांची असली तरी ती मला एकाच ब्रशने चितारलेली आहेत अशी वाटतात. त्यामुळे उलट असा एक वेगळा ‘प्रयोग’ आपल्याकडे होणं मला महत्त्वाचं वाटतं. नाटक हा कलाप्रकार असल्याने प्रत्येकाची त्याची स्वतःची एक व्याख्या आहे, ह्या प्रयोगामुळे ती व्याख्या बदलून जावी असं माझं म्हणणं नाही परंतु, आपण ज्या गोष्टीला ‘व्याख्या’ म्हणत आहोत ती आपण एकदा तपासून घ्यायला हवी असं मला वाटतं. व्हाईट रॅबीट रेड रॅबीटला मी तरी एक नाटक म्हणण्यापेक्षा एक ‘प्रयोग’ असं म्हणेन. कारण, मग इतर नाटकात आपण जसं नाट्य शोधायला जातो तसं जर आपण इथे शोधायला गेलो, तर ते तसं सहजी हाती लागत नाही. त्यामुळेच अनेकांनी मला ह्या नाटकात नाट्य कुठे होतं असा प्रश्न केला. मला वाटतं, ज्या देशात व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, जिथे इंटरनेटवरच्या अनेक साईट्स बॅन केल्या जात आहेत. जिथे तुम्हाला स्वतंत्र जगायची मुभा नाही; जिथे तुम्हाला तो देश सोडून जायचा असेल आणि त्यासाठी पासपोर्ट मिळवायचा असेल तर ज्या देशात सक्तीने दोन वर्ष सैन्यात भरती व्हावं लागतं; अश्या देशामधला एक तरुण लेखक जो की, त्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आजमावून पाहात आहे, आणि स्थळकाळाच्या ज्या एका अनोख्या फॉर्ममधून तो समुद्रापार राहूनही प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधत आहे, आपल्याला काही गोष्टी करायला लावत आहे ह्यातच खरंतर ते ‘नाट्य’ दडलं आहे. काही प्रेक्षकांनी अशी तक्रार केली की, ते त्यांच्या आवडत्या नटाचा प्रयोग पाहायला आले खरे, पण त्यांना तो नट एरवी अभिनय करताना जशी मजा देतो, तशी मजा इथे देऊ शकला नाही. पण गंमत अशी आहे की, हा प्रयोग सादर करत असताना नट कोणतंही सोंग न घेता एक माणूस म्हणून आपल्यासमोर उघडा होतो. एक माणूस म्हणून त्याच्यात असणारे गुणदोष, त्याची बौद्धिक कुवत, संवेदनशीलता, जगाकडे बघायची नजर, तत्त्वं, political stand, त्याला असलेलं सामाजिक भान हे सगळंच समोर येत गेलं आणि प्रेक्षकांचे आवडते नट माणूस म्हणून त्यांच्यासमोर उभे राहिले. मग काहींना ते आवडले तर काहींना नाही. हा प्रयोग असा होता की, एकाच वेळेला नट आणि प्रेक्षक ह्या प्रयोगाचा अनुभव घेत होते. त्यामुळे प्रयोगानंतर सगळे नट सुन्न होऊन, शांतपणे स्वतःच्या अश्या एका गुहेत गेल्याचं मी पाहिलं आहे. आणि, त्याक्षणी त्यांनी माझ्याशी त्यांचे माणूस म्हणून, एक नट म्हणून त्यांचे जे अनुभव शेअर केले ते माझ्यासाठी अनमोल आहेत.
अभय महाजन, मुक्ता बर्वे, अलोक राजवाडे, अतुल पेठे, सई ताम्हणकर, सिद्धार्थ मेनन, सागर देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, जितेंद्र जोशी, अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, हृषिकेश जोशी, गीतांजली कुलकर्णी, अमृता सुभाष आणि पर्ण पेठे अश्या एकूण १५ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक ह्या प्रयोगाचे भाग झाले. नाटककंपनी, QTP आणि अरोरा नोव्हा ह्या संस्थानी हे प्रयोग करण्यासाठी पुढाकार घेतला. मी आणि माझ्यासोबत आमच्या नाटककंपनीच्या रवी चौधरी, दीप्ती कचरे, तेजस लिमये, गंधार संगोराम, अक्षय खैरे, यश पाडळकर इत्यादी लोकांवर प्रयोगाच्या आयोजनाची जबाबदारी होती. वरकरणी पाहता जरी असं दिसत असलं की, एकटा नट स्टेजवर येऊन हे नाटक सादर करतो. इथे म्युझिक, लाईट्सची गरज नाही... तरी काही किमान सेट आणि property ह्या प्रयोगासाठी आवश्यक आहे. दुसरं म्हणजे, शाळेच्या पहिल्या दिवशी, शाळा हा प्रकारच माहीत नसल्याने मूल जसं भांबावून गेलेलं असतं, तशीच काहीशी अवस्था प्रयोगाबद्दल काहीच माहीत नसल्याने नटाची देखील व्हायची. त्यामुळे त्याच्याशी प्रयोगाआधी व नंतरची वर्तणूक फार महत्त्वाची होती. ती त्याच्या प्रयोगावर परिणाम करणारी होती. अशी ही जबाबदारी नाटककंपनीच्या टीमने चोख पार पाडली. व्हाईट रॅबीट रेड रॅबीट हे जरी एका इराणी लेखकानं इराण विषयी लिहिलेलं नाटक असलं, तरी ते ‘इराणी’ राहात नाही. ते एक मोठं राजकीय पातळीवरचं, माणसाच्या वर्तनाविषयीचं वैश्विक सूत्र उलगडत जातं. त्यामुळेच हे नाटक आत्तापर्यंत पंचवीस भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे आणि जगभरात सध्याला त्याचे प्रयोग होत आहेत. म्हणून ह्या लेखामध्ये मी शक्यतो नाटकातील कथानकाचा उल्लेख करणं टाळत आहे. शेवटी मला इतकंच वाटतं की, जशी जफर पनाही ह्या इराणी दिग्दर्शकाला २० वर्ष चित्रपट न करण्याची, कुठेही interview न देण्याची सक्ती केली गेली. पण, नंतर त्याने स्वतःच्याच घरात कैदेत राहून THIS IS NOT A FILM अशी एक फिल्म बनवून ती एका flashdrive द्वारे बर्थडेकेक मध्ये लपवून थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलला पाठवली. जी फिल्म नंतर जगभरात गाजली, आणि त्याची संवेदना लोकांपर्यंत पोहोचली. तश्याच प्रकारे नसीम सोलीमॅनपूर ह्याने सामाजिक राजकीय बंधनातून आलेल्या नैराश्यातून मुक्त होण्यासाठी जे नाटक लिहिलं, आणि तशीच काहीशी परिस्थिती माझ्या आजूबाजूला देखील आकार घेते आहे का? अश्या वातावरणात असणाऱ्या मला; ते नाटक भाषांतरित करून नसीमचा आवाज आणखी बुलंद करता आला हे माझं भाग्य!
सिद्धेश पूरकर
[email protected]
नाटक आणि प्रसिद्धी
निपुण धर्माधिकारी । १ मार्च २०१७
* हा लेख पूर्वी केसरी ह्या वृत्तपत्रात ८ नोव्हेंबर २०१५ला छापून आलेला आहे.
८ नोव्हेंबर २०१५
आमच्या ग्रुपने - नाटक कंपनीने - दळण या नाटकाचे २ सलग प्रयोग काल, म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी,
आयोजित केले होते. दोन्ही प्रयोग अनेक दिवसांपूर्वीच हाऊसफुल झाले. हे असे दोन सलग प्रयोग
करायचे का यावरून खूप चर्चा (म्हणजेच भांडणं) झाली आमच्यात. एकतर तो दीर्घांक, त्यात एक
प्रयोग पूर्णपणे भरवायचा म्हणजे जवळ जवळ ८०० लोकांनी यायला हवं. त्यात कलाकारांची दमछाक
होईल का वगैरे प्रश्न होतेच. आणि अर्थात सर्वात महत्वाचा प्रश्नही होताच - याचं कोडं
लगेच सुटलं कारण असं आपण आधी केलं नाहीये आणि करणं शक्य आहे. दळण हे खूप चांगलं
चालणारं नाटक आहे. आमच्या प्रायोगिक नाट्यसंस्थेचं ते व्यावसायिक नाटक आहे असं आम्ही सारखे
म्हणतो. पण म्हणून २ प्रयोग? मला काही वर्षांपूर्वी झालेल्या प्रसंगाची एक आठवण झाली.
मी अगदी नुकताच दिग्दर्शन करू लागलो होतो. सुरुवातीची २ नाटकं फार चांगली चालली होती.
त्याला रूढार्थाने यश मिळालं होतं. ते डोक्यात ठेवून पुढचं नाटक बसवायला घेतलं. चांगला लेखक,
जरा वेगळे कलाकार, चांगली संस्था वगैरे वगैरे. हे पण नाटक अर्थातच चालणार! प्रयोग बसलाही
चांगला होता. पण काही केल्या त्या नाटकाचं काहीच होईना! म्हणजे कोणी चांगलंही बोलेना आणि
वाईटही. कोणी काही बोलेनाच! नाटकाला कोणीच येईना.मग लक्षात आलं की त्याच्या जाहिरातीवर
फार लक्ष दिलं नाही. पण जाहिरातीचं काय आहे एवढं?नाटक चांगलं असलं की लोकं येणारच.
पहिल्या पहिल्या प्रयोगांना आलेले लोकं इतरांना सांगणार आणि word of mouth ने लोकं
येणारंच!जाहिराती फक्त प्रयोग कुठे आहे आणि किती वाजता आहे याचं काम करते. या मताचा मी
होतो. एकंदरीतच आपलं जगणं आणि आपले निर्णय हे किती जाहिरातीमुळेच ठरतात हे तसं फार नंतर
उमगलं. असो, पण इतकं खोलात न शिरता फक्त नाटकांच्या जाहिरातीबद्दल बोलू.
तर दळण चे २ प्रयोग लावले होते. आता आमचा अमेय वाघ टी.वी. वर दिसतो. भयंकर लोकप्रिय
आहे तो सध्या. पण अशा सगळ्यांचीच नाटकं चालतात असं नाहीये. मोठ मोठी नावं असलेल्या
कलाकारांची नाटकं पडलेली आपण पाहिलीयेत. तर दळण चा एक प्रयोग केला असता तर त्याला
नक्की गर्दी होईल याची खात्री होती, पण सलग दोन प्रयोगांमुळे तेच एकमेकांना मारक ठरतील का
असा विचार येत होता. पण गेला वर्षभर आमच्या प्रयोगांची मार्केटिंगची जबाबदारी हाताळणारा
गंधार फारच खात्रीने सांगत होता की दोन्ही प्रयोगांना खूप गर्दी होईल. त्याच्यावर विश्वास टाकून
आम्ही आमची चर्चा थांबवली. गंधार संगोराम हा मुळात संगीतकार आहे. त्याला संगीतासाठी झी
गौरव सारखे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तो सध्या चित्रपट, नाटक याला संगीत देण्याबरोबर
अमेयचीच दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेला पार्श्वसंगीत देतो. मार्केटिंगसाठी त्याला प्रशांत
वैशंपायन फार मोलाची साथ देतो. प्रशांतचं शिक्षण आणि नोकरी हे कॉम्पुटर हार्डवेअर नेटवर्किंग
मधलं आहे. या दोघांनी मिळून गेल्या वर्षभरात प्रत्येक प्रयोगाला (प्रत्येक नाटकाला नाही, प्रत्येक
प्रयोगाला) वेग वेगळ्या पद्धतीची campaigns अगदी यशस्वीपणे चालवली आहेत.त्या इतक्या
चांगल्या आणि नवीन कल्पना आहेत की त्यांचा वापर इतर अनेक संस्था - फक्त नाटकाशी निगडीत
नव्हे - करताना आम्ही पाहिल्या. नाटक कसं आहे, कुठे आहे, येणारा प्रेक्षकवर्ग कुठला आहे याचा पूर्ण
विचार करून ते campaign ठरवतात. उदाहरण द्यायचाच झालं तर बिनकामाचे संवाद या
नाटकाला त्यांनी Whatsapp वर येणाऱ्या फालतू फॉरवर्ड मेसेजचा वापर करून शेवटी फक्त नाटकाचं
नाव, स्थळ, वेळ आणि फोननंबर दिले. त्यामुळे नाटकाचा अर्थ पण अधोरेखित झाला, whatsapp वर
होणाऱ्या या बिनकामाच्या संवादांचा पण वापर झाला आणि जाहिरातही झाली!
जवळ जवळ ५० लोकांना त्यांनी एकत्र जमवलं आहे जे नाटकाची जाहिरात करायला उत्सुक आहेत.
त्या समूहाला एक अगदी साधी जबाबदारी दिली जाते की इतक्या इतक्या वाजता हा फोटो फेसबुक
वर टाका वगैरे वगैरे. ऐकताना साधं वाटेल, पण जेव्हा एकदम ५० हून लोकं एका गोष्टीबद्दल एकदम
बोलतात तेव्हा आपोआप जाहिरात होते. तो विषय एकाच वेळेला खूप लोकांपर्यंत पोहोचतो. त्यानंतर
प्रयोगांसाठी त्यांनी सध्या तेजित असलेल्या dubsmash चा वापर केला. ज्यांना माहिती नाही
त्यांच्यासाठी सांगतो की dubsmash म्हणजे एक १० सेकंदांपर्यंतचा video असतो ज्यावर मागे
कुठल्यातरी नावाजलेल्या पिक्चरचा डायलॉग किंवा गाणं वाजतं आणि त्यावर तुम्ही अभिनय
करायचा. तर त्यावर त्यांनी दळण ची गाणी, काही संवाद upload केले आणि विविध लोकांनकडून
dubsmash करून घेतलं. आत्ताच्या प्रयोगांचं सांगायचं झालं तर दोन प्रयोग असल्या कारणाने त्यांनी
अनेक लोकांचे डबल रोल असलेले छोटे छोटे विडीयो बनवले. म्हणजे २ अमेय वाघ हे विडीयो
बघणाऱ्या माणसांशी आणि प्रेक्षकांशी बोलून त्यांना प्रयोगांना यायचं आवाहन करत आहेत.
( https://www.facebook.com/natakco/videos/10153728178259310/ )
या सगळ्यात अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की ही सगळी कामगिरी ते सोशल मिडिया वर करतात जो
फुकट उपलब्ध आहे!त्यामुळे जाहिरात तर चांगली होतेच पण खर्चही खूप कमी होतो ज्यामुळे फायदा
हा शेवटी संस्थेचाही होतो. प्रयोगांना लोकं येतात म्हणून प्रयोग करायचा उत्साह वाढतो, त्याची
संख्या वाढते. त्यात जाहिरातीपासून नवे प्रयोग होताना पाहून नवे लोकं आकर्षित होतात. थोडक्यात
अजून प्रेक्षकवर्ग तयार होतो.
पुढच्या प्रयोगाला आता हे काय करणार आहेत याची मला स्वतःला तरी फार उत्सुकता असते, आणि
प्रत्येक वेळी काहीतरी नवीन ते घडवतातच! हे दोघं कदाचित स्वतःला आनंद मिळतो म्हणून हे काम
करत असतील, पण ते किती महत्वाचं आहे हे त्यांना अजून माहिती नाहीये..नुसतं संस्थेलाच नव्हे तर
एकंदरीत नाट्यसृष्टीला.

श्री. ना. कं. संथ
धर्मकीर्ती सुमंत । १५ फेब्रुवारी २०१७
(उगीचच्या गंभीर आवाजात)
एकविसाव्या शतकातील, उत्तर भांडवलशाहीच्या काळातील कलाव्यवहार हे कलाबाह्य मानल्या जाणाऱ्या गोष्टी देखील कलाक्षेत्रात आणू बघत आहेत. त्या आणणे शक्यही आहे. म्हणजे mobile विरुद्ध नाटकाची mobile वरूनच publicity होणे शक्य आहे. त्यात ह्या अंतर्विरोधांचे उत्सवीकरण होत आहे. एकाबाजूला सिनेमा आणि टेलिव्हिजन चे आव्हान, दुसऱ्या बाजूला संस्कृतीचा विक्रय. भाषेची सृजनशीलता कमी होत जाणं, नेपथ्य दळणवळणाच्या दरम्यान नष्ट होत जाणं, प्रयोगानंतरच्या शंभर रुपये भत्त्यामध्ये बडा गोल्ड flake चे पाकीट कसेबसे manage होणे, सृजनशीलतेचा स्रोत गांजा, जो प्रायोगिक रंगभूमीचा कणा आहे, त्याच्यातही कापराची भेसळ होणे, सुंदर मुलींना राजकीय भूमिका नसणे, आणि राजकीय भूमिका असलेल्या मुली ह्या ग्रुपमध्ये फारवेळ टिकू न शकणे, कॉफी मध्ये जायफळ घालावे की नाही, ह्या इथल्या कम्युनिस्टांच्या प्रश्नावर प्रायोगिक रंगभूमीची काहीही प्रतिक्रिया न येणे, मध्येच कॉफीत जायफळ म्हणजे जायफळच घातले जाईल असे म्हणणारा एक गट, पानसऱ्यांना गोळ्या घालून, आर आर आबांच्या शोकसभेमध्ये ती सामील होणे, त्यामुळे दिसेनासे होणे. हे चालू आहे. ह्या सगळ्या अंतर्विरोधामध्ये काही कमी आहे की काय असे वाटता वाटता परवा ‘डूडे आई वान्ना जॉईन नाटक कंपनी प्लीझ्झ्झ्झझ्झ्झ्झझ’ असा आम्हाला एक मेसेज आला. त्याचा डिस्प्ले picture हा एस श्रीसंथ ह्या #एक्सक्रिकेटर-sorry- #dancer- sorry- #bollywoodstar- sorry- #whatsapp स्माईली-sorry- #वाईटhairstyle- sorry –#ह्याचं_लग्नही_झालं?- sorry- #(बास कंटाळा आला) चा होता म्हटल्यावर आम्हीही तो ignore केला. एक चकित करणारी गोष्ट हीच की त्याचे डिस्प्ले नावही एस श्रीसंथ हेच होते. असं झाल्यानंतर आम्ही त्याला ignore करू लागलो, तर त्या गृहस्थाचा चा मला whatsapp वर देवनागरीत एक sms आला. नमस्कार- मी एस श्रीसंथ- आणि मला नाटक कंपनी जॉईन करायची आहे. spam म्हणून आम्ही तो message जसा ignore करू लागलो तसे त्याने bcci ने त्याला भारतीय क्रिकेट मधून निलंबित केल्याचे एक पत्र image स्वरूपात पाठवले. आमच्या manager ला हे जेव्हा कळवण्यात आले, तेव्हा तोंडाऐवजी गुडघ्यातून बोलणाऱ्या manager ने त्याला एक voice नोट पाठवली.
(नुसताच खरखर आवाज काढला जाईल.)
त्यावर श्रीसंथ चा ‘हो येतो मी रूपालीत.’ असा sms आल्यावर आम्ही चाट झालो. सौ. गपचूप उर्फ गुडघ्यातून बोलणारे नाटक कंपनीचे manager सौ. गपचूप ह्याचे diction जो माणूस ओळखू शकतो, तो भलेही एस श्रीसंथ नसेल, त्याला आम्हाला भेटायचे होते. रुपालीबाहेरच्या फुटपाथवर चेहऱ्यावर एक बालीश मठ्ठ हास्य असलेला tower चालत येताना दिसला. तो खरा श्रीसंथच होता. श्रीसंथ इतका उंच होता, की त्याच्यापर्यंत पोहोचायला एक लिफ्ट होती. श्रीसंथच्या तळपायाशी pantaloon चे शोरूम होते. पहिल्या मजल्यावर crossword होते, आणि वाटेत जाताना Mainland China होते. श्रीसंथवर काही secret कॅमेराज लावलेले होते. त्यामुळे आमच्या manager ने स्वतःचे डोळे झाकून घेतले. जसे आम्ही श्रीसंथ च्या बेसमेंट मध्ये गाडी लावून वर गेलो, तेव्हा आम्ही रुपालीच्या फुटपाथ पाशी आहोत हे विसरून गेलो, आम्ही पुण्याचे हे विसरलो. पार्किंगमध्ये Constantin आणि Stanislavski असे दोघे आम्हाला guide करायला होते. त्यांनी आम्हाला लिफ्ट कडे जायची दिशा दाखवली. जाताजाता ते रशियनमध्ये ‘सिक्राबू दिका बोर खाती’ अर्थात, you are on the right track असे म्हणून गेले. लिफ्ट मध्ये मी, manager चढलो. ‘कोत्स्या’ उर्फ लिफ्ट man आम्हाला जाताजाता म्हटला, की त्या कॉन्स्टन्टाईन ला काहीका म्हणूदेत, तुम्ही realism चा तुमच्या संदर्भात अर्थ लावा. नाहीतर अनुपम खेर ह्यांच्या ‘An Actor Prepares’ ह्या Acting School मध्ये प्रवेश घ्या.वाटेत आम्हाला तुर्ग्नेव, ओस्त्ट्रोवस्की इब्सेन, shaw आणि oscar wilde चे मजले लागले. मग एका ठिकाणी थांबून आमच्या शरीराच्या सगळ्या बाजूला स्पर्श करण्यात आला. ह्याला सध्या लोक security check असे म्हणतात. Security चेक मध्ये आमचे हात जप्त करण्यात आले. जाताना घेऊन जा सर असे ती व्यक्ती वास्तववादी अभिनयशैलीत म्हटली- मग आमचा विश्वास बसू लागला. वास्तववादातल्या कश्यावरही आम्ही विश्वास ठेवायला शिकलो आहोत. विश्वास बसू लागला. आणि जसे आम्ही एस. श्रीसंथच्या floor वर पोहोचलो, तसा गडद अंधार होता. इतका, की आमचे सेन्सेशन गेले. आम्ही आहोत असे वाटेनासे झाले. आणि श्रीसंथ चा आवाज आला. Great Dictator मध्ये हिटलर चा येतो तसा. श्रीसंथ ने टिचकी वाजवली तसे काही पार, foot, moving spots, spots on झाले आणि तेंडूलकर, दुबे, चेतन दातार आणि हबीब तन्वीर बादलदा ह्यांना वेगवेगळ्या भिंतींवर positions मध्ये fix केले होते. ‘ह्यांनी फिक्स व्हायला नकार दिला.’ श्रीसंथ चा आवाज घुमला. फिक्स होण्यात काय वाईट आहे? तेंडुलकरांना भावनिक, बादलदांना प्रचारकी, दुबेला वेडा, हबीब तन्वीरला उपद्रवी आणि चेतन दातारला बिचारा म्हणणारे लोकं आहेतच की- शिवाय ह्यांना मरून खूप वर्ष नाही झालीत अजून. ज्यांना मारून खूप वर्ष झालीत, त्या मंडळींचे असेच towers उभे राहिलेत. म्हणजे, चाणक्याच्या tower मध्ये, चाणक्य हा पिलेल्या बायकांना toilet च्या दारापासून कमोड पर्यंत जायला assist करतो. स्टालिन चा tower china मध्ये आहे...इत्यादी. परदेशी चालतं फिक्सिंग. Birdman पाहिला का? “हो हो! पाहिला” असे आमचा manager उत्साहाने म्हटला. त्यावर श्रीसंथ म्हटला त्यावर इथे काही बोलायचे नाही. Hollywood च्या फिक्सिंग चे सेक्शन वर आहेत. तिथे काही japanese लोकं येऊन त्यांना हवे असणारे सिनेमे fund करतायत. इथे सगळे छोटे-छोटे subjects आहेत आमचे. छोटे म्हटल्यावर manager ला राग आला. तो म्हटला, आम्ही नुसते ह्या mall मध्ये आलो, म्हणून pantaloons च्या बाहेर एकानी housefull चा बोर्ड लावलाय. भरत इतिहास संशोधन केंद्राला उगीच गर्दी झालीये असे कोणामुळे वाटते मग? “बर. आम्ही इथे का आलोय पण?”- मी विचारलं. “आता काही मुली खूप सुंदर दिसतात.”- असे श्रीसंथ म्हटला. त्यावर मी ‘मग’? असा चेहरा केला- “त्यावर तो म्हटला, पण जाड, अस्वच्छ, एटू, अपंग, प्रेग्नंट, सलील कुलकर्णीची गाणी ऐकणाऱ्या, सत्यमेव जयते बघणाऱ्या मुलींबरोबर पण batting करावीशी वाटतेच की आपल्याला. आणि तसेही क्रिकेट ९७ गेम आल्यानंतर आपण क्रिकेट खेळणे बंद केले का? थर्ड अम्पायर, स्निकोमीटर, हॉक आय तंत्र असताना अम्पायर असतोच ना गेम मध्ये? 'सिक्रेट' पुस्तक आल्याने न्युरोसायंस चा अभ्यास थांबत नाही, आणि अच्युत गोडबोले लिहित असले तरी- समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण, मानसशास्त्र, स्टीव्ह जॉब्स चे मरण, law college रस्ता कसा क्रॉस करायचा, smart phone वर स्क्रीन guard कसे लावायचे ह्या विषयांवर काम करणारी लोकं आहेतच की. “ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र बोलताय.” "सांगायचा मुद्दा हा, की तुमचंही काहीतरी होऊ शकतं. प्रत्येकाला जागा आहे इथे...प्रायोगिक नाटकाला fund करणारी एक कंपनी काढायचा विचार आहे..." श्रीसंथ ने continue केलं. "मराठी प्रायोगिक नाटक. उत्तर ध्रुवावर एक जागा आहे. तिथे पुण्यासारखी हवा तयार केलेली आहे. आणि दर नाटकाला अडीचशे असा प्रेक्षकवर्ग जमेल अशीही व्यवस्था आहे. त्यात २ happily unmarried ची crockery वापरणारी लोकं, २ either or ला जाणारी लोकं, २ पूर्ण बाह्यांचे कुर्ते घालणा-या आणि २ अच्युत गोडबोले हे फिक्स येणार ह्याचीही व्यवस्था केली आहे. नव्या सरकार मध्ये खूप funds आहेत. सगळ्याचे documentation होणार आहे. त्यामुळे इतिहासात काहीतरी महत्त्वाचे केल्याचा फील तुम्हाला येईल. तिथे मराठी प्रायोगिक नाटक हे नक्की प्रायोगिक आहे का? किंवा आपण कशाला प्रयोग म्हणतो असे प्रश्न विचारणाऱ्यांचीही सोय केली
जाईल."
Manager नी एक torch काढला. पण त्याचा प्रकाशच पडला नाही. त्याला प्रकाश न पडण्याचे हसू येऊ लागले. आम्हीपण श्रीसंथ च्या डोक्यात किती अंधार आहे... किती अंधार आहे... असा विचार करत खूप हसलो. नंतर आम्हाला लक्षात आलं, की आमचे हसू आम्हालाच ऐकू येतंय फक्त. आम्ही गोठून गेलो होतो. हवा अगदी पुण्यासारखी होती. सगळं अगदी पृथ्वीसारखं होतं.
शहरे, झाडे, गावं, खेडी, बर्फ पाणी, हवा, समुद्र.